
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली, वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारकडून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता, तसेच एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली होती. अखेर सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र या आरोप पत्रावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
चार्ज शीटवर शंका आहे, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात सीआयडीनं चार्ज शीट दाखल केलं. मात्र उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आलं, यामध्ये बड्या नेत्याचं नाव आलं नाही, त्यामुळे शंका आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान सध्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. ते राहिले काय आणि नाही राहिले काय, काही फरक पडत नाही. मी अशांना मोजत नाही. पार कार्यक्रम लावून टाकला आहे. आता बाकीच्यांना खडी फोडायला जावं लागेल, मुंडे मंत्री असो किंवा नसो काही फरक पडत नाही. आपले नीट नाहीत, राजकीय अजेंडा चालवतात, असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना बरं वाटत नाहीये, त्यांची तब्येत बिघडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या तब्येतीबाबत देखील माहिती दिली. 15 दिवसांपासून अंग दुखत आहे, डोळ्यांना अंधाऱ्या आल्या सारख झालं होतं. प्रवास खूप झाला म्हणून तब्येत बिघडली, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणात नुकतचं सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.