
Dnyaneshwari Munde on Beed Police : काल बीड परिसरात दोन मेळावे झाले. एक भगवान भक्ती गडावर तर दुसरा नारायण गडावर झाला. या दोन्ही दसरा मेळाव्यानंतर बीडमधील राजकारण ढवळून निघण्याची दाट शक्यता आहे. मुंडे भाऊ-बहिणीच्या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर गवान गडावरील मेळाव्यात वाल्मिक कराडची पोस्टर झळकल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्यातच महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी पोलिसांच्या आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या खून प्रकरणात एवढं दडलंय काय?
महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी तपास यंत्रणा आणि राज्य सरकारला धारेवर धरले. 21 ऑक्टोबर महादेव मुंडे यांच्या खूनाला दोन वर्ष होत आहेत. 23 महिने उलटून गेले तरीपण आरोपी अजून निष्पन्न नाही. एका गरीब कुटुंबाने मुख्यमंत्रीपर्यंत जाणे ही काय सहज गोष्ट नाही. प्रकरणांमध्ये एवढं दडलय काय की आरोपीच निष्पन्न होत नाहीत आता मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे, असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विचारला.
महादेव मुंडे केस प्रकरणांमध्ये एवढं दडलय काय आरोपीच निष्पन्न होत नाहीत मारलं तर मारलं कुणी देवाने येऊन मारलं का मारलं तर इथल्याच कोण असेल ना तरीपण हे पोलीस प्रशासन आरोपी पर्यंत पोहोचत नाही, असा रोकडा सवाल त्यांनी विचारला. कुठलेही टोकाचे पाऊल जरी आले तरीही मी माझ्या नवऱ्यासाठी लढतच राहणार असा इरादा त्यांना बोलून दाखवला.
आमच्या विश्वासाला तडा देऊ नका
मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आणि स्वतः आम्ही पंकज कुमावत यांच्यावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्र्यांकडून त्यांची नियुक्ती करून घेतली. आम्हाला पंकज कुमावत यांच्यावर एवढा विश्वास आहे. अजून पण विश्वास आहे. पण आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अजून मला माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी संघर्ष करावा लागेल ही वेळ येऊ देऊ नका. दोन महिने झाले. एसआयटी काय करते, काय नाही काही माहिती नाही. मग आरोपी कधी अटक करणार आणि मुख्यमंत्र्यांनी पण एसआयटीचा फॉलोअप घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आता सर्व बाबी समोर येऊ द्या
हे प्रकरण आता मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलं. आरोपीपर्यंत जाण्याची किती प्रतीक्षा करायची, माझा 17 सप्टेंबर रोजी जवाब झाला. जवाब घेऊन अजून काहीच नाही फक्त प्रोसेस चालू आहे असं म्हणत आहेत.किती दिवस प्रोसेस चालू राहणार साहेब जोपर्यंत आरोपी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष चालूच ठेवणार. या प्रकरणात नेमकं दडलंय काय हे पण तुम्ही जगाच्या समोर येऊ द्या. पंकज कुमावत हे नेमकं तुम्ही आरोपीपर्यंत का पोहोचू शकत नाहीत, हे पण मांडा. सानप सरांचे सीडीआर काढा. भास्कर केंद्रेचे सीडीआर काढा. मला स्वतःहून येलमाटे हे म्हणाले होते की आणि आता ते एसआयटी पथकात पण आहेत, त्यांनी मला सांगितलं की तपास थांबविला.
मी स्पष्ट नाव सांगितलं आहे की जगमित्रचं कार्यालय वाल्मीक कराड संभाळत होता. त्याचा फोन आल्याशिवाय हा तपास थांबू शकले नाहीत. कारण परळीतील टाचणी पडलेली सुद्धा त्यांना कळत होती. मग एवढा त्यांच्या दारासमोर खून होऊन समजत नाही की आरोपी कोण आहेत. पोलीस प्रशासन एकदम निर्लज्ज आहे. पोलीस प्रशासनावरील गरीब लोकांचा विश्वासच उडून गेला. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्रातील जनता सोबत आहे. पण आरोपी कधी अटक होणार? न्याय मागायचा कोणाकडे? आता मुख्यमंत्र्यांनीच याचं उत्तर द्यायला हवं असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.