ब्रेक निकामी, वेग अनावर… आणि क्षणात कार विहिरीत; बेतुलमध्ये भीषण अपघात, 3 तरूण जखमी !
बेतुल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात घडला, ज्यात ब्रेक निकामी झाल्याने भरधाव कार ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. अमरावती येथील तीन तरुण जखमी झाले असून, त्यांना गावकरी व १०८ रुग्णवाहिकेच्या पथकाने धाडसाने बाहेर काढले. वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमींवर भैंसदेही येथे उपचार सुरू आहेत.

देव तारी त्याला कोण मारी.. अशी म्हण आहे. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव बेतुलमध्ये 3 तरूणांनाआला. भरधाव वेगाने जाणारी कार 35 फूट विहीरात कोसळल्यावर मृत्यू समोर दिसत होता, मात्र सुदैवाने त्या तीनही तरूणांचा जीव वाचला. गावकऱ्यांनी मदतीसाठी तातडीने धाव घेत त्यांना वाचवलं, मात्र ते तिघे जखमी असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. या भयानक अपघाताची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी बेतुल जिल्ह्यातील भैंसदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर रस्ते अपघात घडला. गुडगाव-धामणगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारी एक कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या 35 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात तीन तरुण जखमी झाले असून, त्यांना गावकरी आणि 108 रुग्णवाहिकेच्या पथकाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. राहुल काडू, सत्यम तोमर आणि कृष्णा मोकडे अशी तीन तरूणांची नावं असून ते अमरावती जिल्ह्यातील भाटकोली गावचे रहिवासी आहेत.
35 फूट विहीरीत धाडकन कोसळली कार
रविवारी सकाळी बेतुल जिल्ह्यातील भैंसदेही पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गंभीर अपघात घडला, ज्यामुळे परिसरात काही काळासाठी घबराट पसरली. हे तिनही तरूण त्यांच्या कारमधून घरी परतत होते. मात्र प्रवासादरम्यान कारचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने गाडी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिवेगामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच, जवळचे गावकरी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी तात्काळ बचाव व मदतकार्य सुरू केले. गावकरी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तात्काळ 108 नंबरवर कॉल करत रुग्णवाहिका सेवेला याची माहिती दिली. अपघाताबद्दल समजताच रुग्णवाहिकेचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
असा वाचवला जीव
यानंतर 108 रुग्णवाहिकेचे ईएमटी (EMT) दीपक बारस्कर आणि पायलट मोहित चाडोकर यांनी विहिरीत उतरून धाडस दाखवत त्या तरुणांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गावकऱ्यांच्या मदतीने, मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देऊन भैंसदेही येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिघेही बरेच जखमी झाले आहेत.
मात्र गावकरी व रुग्णवाहिकेतील कर्मचारी यांनी वेळेवर बचाव आणि मदतकार्य केल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर काही काळ परिसरात लोकांची गर्दी जमली होती आणि वातावरण तणावपूर्ण होते. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कसा झाला, याबद्दल माहिती गोळा करत आहेत.