Bhandara News : दोघे चिमुकले भाऊ स्लॅबवर खेळत होते, उडी मारण्याच्या नादात एकाचा तोल गेला अन्…

आई-वडील शेतात कामाला गेले होते. दोघे भाऊ घरी होते. काही वेळाने जे घडलं त्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Bhandara News : दोघे चिमुकले भाऊ स्लॅबवर खेळत होते, उडी मारण्याच्या नादात एकाचा तोल गेला अन्...
भंडाऱ्यात स्लॅबवरुन पडून मुलाचा मृत्यू
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 01, 2023 | 8:29 AM

भंडारा / 1 ऑगस्ट 2023 : काळीज पिळवटून टाकणारी भयंकर घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आई-वडील शेतावर कामाला गेले होते. दोघे भाऊ घराजवळ असलेल्या स्लॅबवर खेळत होते. खेळताना मोठ्या भावाचा तोल गेला अन् खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत मुलगा इयत्ता तिसरीत शिकत होता. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोहगावात शोककळा पसरली आहे.

आई-वडील शेतात कामाला गेले होते

मोहगाव गावातील प्रशांत साखरवाडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. प्रशांत यांना 9 वर्षाचा आणि 6 वर्षाचा अशी दोन मुलं आहेत. मोठा मुलगा तिसरीत तर लहान मुलगा पहिलीत शिकत होता. साखरवाडे कुटुंब शेतकरी आहे. सध्या धान लागवड सुरु आहे, त्यामुळे आई-वडिल दोघे शेतात कामाला गेले होते. तर मुलाचे काका आणि आजोबा घरी होते. दोन्ही मुलं घराजवळील स्लॅबवर खेळत होती.

मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले पण…

स्लॅबवर उड्या मारत असताना 9 वर्षाच्या मुलाचा तोल गेला आणि तो खाली पडला. भाऊ पडलेला पाहून लहान मुलगा दोन किमी अंतरावर शेतात धावत गेला आणि वडिलांना याची माहिती दिली. वडील येईपर्यंत मुलगा जागीच जखमी अवस्थेत पडलेला होता. वडिलांनी धावत येत मुलाला तात्काळ भंडारा येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.