एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, दिल्लीवरून सूत्र हालणार, शिंदेंच्या जवळच्या नेत्याचा खळबळजनक दावा, सगळं सांगून टाकलं!
दिल्लीवरून सूत्र हालले की शिंदे मुख्यमंत्री होतील. आम्हा सगळ्यांनाच वाटते की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत. परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा दिल्लीला आहे, असे गोगावले म्हणाले.

Eknath Shinde : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशा आशयाचं विधान केलंय. विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील अशीच भावना व्यक्त केली. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चेला नव्याने उधाण आलेले असताना दुसरीकडे शिवसेनेच्या एकत्रिकरणावरही नेते बोलायला लागलेत. दरम्यान, मंत्री तथा शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी एक विधान करून राज्यात खळबळ उडवून दिली आहे. 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीआधीच राज्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुक्यमंत्री होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
राजकारणात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही
अगोदर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणार भाष्य केलं. राजकारणामध्ये कधी काय घडेल हे आज कोणीच सांगू शकत नाही. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे तुम्ही आम्ही कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे काय होईल हे आज तरी आम्ही सांगू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली.
दिल्लीतून 2029 साली सूत्र हालतील
पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रिपदावर महत्त्वाचे भाष्य केले. “जनतेच्या मनातला विचार आहे. दिल्लीवरून सूत्र हालले की ते होणार आहे. आम्हा सगळ्यांनाच वाटते की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत. परंतु याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा दिल्लीला आहे. दिल्लीतील नेत्यांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. दिल्लीतून 2029 साली सूत्र हालतील असं वाटतंय,” असं मोठं विधान गोगावले यांनी केलंय. सोबतच शिंदे यांना मुख्यमंत्रिपद कधी मिळणार ते नेमकेपणानं सांगता येणार नाही. परंतु हे होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्रिपदाची माळ अन्य नेत्याच्या गळ्यात पडू शकते, असा दावा वेळोवेळी केला जातो. यावर फडणवीस यांनी मी कुठेही जाणार नाही,असे सांगत अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे आता गोगावले यांनी केलेल्या विधानात किती तथ्य आहे, भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.