
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून त्यावरून राज्यात रण पेटलं आहे. गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजाा केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेता वसंत मोरेंनी केली होती. तर त्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांच्याकडूनही भरत गोगावलेंचा आणखी एक दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी विद्येचा आरोप केला. या सर्व प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजलेली असतानाच आता गोगावले यांनी य़ा विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अघोरी विद्या आम्हाला कळत नाही, अघोरी विद्या माहीत असती तर आत्तापर्यंत कधीच पालकमंत्री झालो असतो, असं म्हणत गोगावलेंनी स्पष्टीकरण देत विरोधांवरही हल्लाबोल केला.
कर्जत येथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची कार्यकारणी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीप्रसंगी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेलीच गोगावले यांनी सध्या अघोरी विद्येच्या, पूजेच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांना टोलाही लगावला.
तर अघोरी विद्या करून पालकमंत्री झालो असतो
” आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही लढणारे आहोत, रडणारे नव्हे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. एकनाथ शिंदेंसारख्या प्रामाणिक नेत्यासोबत आम्ही काम करतो त्यामुळे ही अघोरी विद्या, अघोरी पूजा वगैरे आम्हाला काहीही कळत नाही, आम्हाला ते माहीत नाही. जे नशिबात आहे तेच होतं. अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्री पद मिळवलं असतं”, असं म्हणतं भरत गोगावले यांनी आरोप करणाऱ्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं. ” अघोरी, बिगारी आम्ही जाणत नाही, साधू महात्मे भेटायला येतात त्यानं आम्ही भेटतो. राष्ट्रवादी कडे मुद्दे नाहीत म्हणून ते शोधाशोध करीत आहेत” अशी टीकाही गोगावले यांनी केली.
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून दोन व्हिडिओदेखील शेअर केले होते. त्यात मंत्री गोगावले हे काही पूजा करताना दिसत होते. मात्र ही पूजा कशाची,ती का करण्यात आली, यातची काही माहिती त्यातून समोर आली नाही. पण गोगावले यांची ही पूजा अघोरी असल्याचे सांगत अघोरी विद्येसाठी ही पूजा बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आल होता. त्यावरूनच सध्या राज्यात राजकारण पेटलं आहे.