सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, तुम्ही अवमान तरी करू नका; मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला सुनावले; थेट विधानसभेत…

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यांनी आपल्याच सरकारला सावरकरांचा अवमान न करण्याचा इशारा दिला. भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाची आठवण करून देत, फाईल अडवून ठेवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांनी पुढील अधिवेशनात हा प्रस्ताव आणण्याचे आश्वासन दिले.

सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, तुम्ही अवमान तरी करू नका; मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला सुनावले; थेट विधानसभेत...
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Jul 10, 2026 | 2:10 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा सरकारच्या निदर्शनास आणला आहे. त्यावरून मुनगंटीवार यांनी सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकार सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव आणत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांना चांगलंच घेरलं. तसेच सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव लवकरात लवकर आणावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्याच मंत्र्यांना खडेबोल सुनावले. स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्याची मागणी मी केली होती. केंद्र सरकारकडे अशी शिफारस करू, असं मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं होत. मात्र कामकाज पत्रिकेत याबाबतचा कोणताही उल्लेख नाही. सावरकरांना इंग्रजांनी यातना दिली आता आपण अवमान करू नये, असा संताप सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सत्ता येताच विसरू नका

भाजपच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न देण्याचं ठरलं होत. संसदीय कार्यमंत्र्यांना आठवण करून देतो की सत्ता आल्यावर असं विसरून जाण योग्य नाही. आता पुन्हा हे सभागृहात मांडणार नाही. फाईलला इतकी यातना का होत आहे? ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सावरकरांच्या विचारांवर जगलो, पण आता आपलं सरकार अश्या पद्धतीने फाईल दाबून ठेवत असेल तर हे योग्य नाही, असा उद्वेग सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पुढील अधिवेशनात

दरम्यान, मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं. सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव हा चर्चेतून यावा म्हणून म्हणून आज हा प्रस्ताव आणला नाही. पुढील अधिवेशनात प्रस्ताव आणला जाईल, असं नार्वेकर म्हणाले.

राम मंदिरावर चर्चा

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीचे आज विधानसभेत प्रचंड पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारची अक्षरश: पिसे काढली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनीही या मुद्दयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

 

Follow Us