नाराजी… खदखद…? उद्धव ठाकरे यांना भेटणार का?; भास्कर जाधव यांनी थेटच सांगितलं

ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी निवृत्तीच्या चर्चांना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या कथित मतभेदाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपण नाराज नसल्याचे व ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. त्यांनी निवृत्तीसंदर्भातले विधान वैयक्तिक मत म्हणून मांडले असून, पक्षाच्या कामात ते सक्रिय राहतील असेही स्पष्ट केले आहे.

नाराजी... खदखद...? उद्धव ठाकरे यांना भेटणार का?; भास्कर जाधव यांनी थेटच सांगितलं
uddhav thackeray bhaskar jadhav
| Updated on: Jun 23, 2025 | 12:56 PM

ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच एका भाषणावेळी भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही व्यक्त केली होती. मला क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. आता भास्कर जाधव यांनी या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. मी नाराज नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासाही करत नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मी नाराज नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाही त्याबद्दल मी खुलासाही करत नाही. माझ्याबद्दल कोणी सातत्याने बोलत असेल तर त्याबद्दल भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

कुठलाही नाराजीचा संबंध नाही

आठ वेळा वेगवेगळ्या निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबवसं वाटतं हे माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी, कोणी निवृत्त व्हायला सांगितलं. माझ्यात लढण्याची धमक आहे. माझ्यात संघर्ष करण्याची ईर्ष्या आहे. २०२२ पासून मी प्रत्येक मैदानावर लढण्याचे काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत, ही नाराजी आहे, मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. स्वत:च स्वत:बद्दल सातत्याने सर्टिफिकेट देणे हे मला जमत नाही. मी आधी करतो, नंतर सांगतो. आज मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका स्वत:हून अंगावर घेण्याचा निर्णय मी घेतोय. माझ्या सहकाऱ्यांना ते मान्य असेल तर मी त्यात उतरणार आहे. पक्षाला यश मिळवून देण्यासाठी उतरणार आहे. ही नाराजी असेल तर गप्प घरी बसणं, पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं याला काय म्हणायचं? म्हणून कुठलाही नाराजीचा संबंध नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.

मला गेटवर एक सेकंदही थांबवलं जात नाही

यानंतर भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मला कधीही थांबव लागत नाही, असाही खुलासा केला. मला उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी कधीही अपोईटमेंट घ्यावी लागत नाही. कधीही मला गेटवर एक सेकंदही थांबवलं जात नाही. माझी गाडी पाहिल्यानंतर सर्व सुरक्षारक्षक ओळखतात. त्यावेळी एक सेकंदही न थांबता माझी गाडी थेट आत पाठवली जाते. मी माझी शिस्त पाळतो. पण मी गेटवर उभा राहतो, चेक करा म्हणून सांगतो. कारण माझ्या नेत्याची सुरक्षा व्यवस्था मलाच महत्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला बोलवायला पाहिजे असं काहीही नाही. मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो. त्यांना वाटेल तेव्हा ते कधीही बोलवू शकतो. आमच्यात काहीही अंतर राहिलेले नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.