
राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महानगर पालिकांच्या निवडणुका अलिकडेच पार पडल्या आहे, त्यानंतर आता जिल्हा 12 परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. अशातच आता कोल्हापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या महिला नेत्याने राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या शीतल फराकटे यांना अजित पवारांची साथ सोडली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शीतल फराकटे यांनी पक्षाची साथ सोडली. यानंतर शीतल फराकटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना शीतल फराकटे यांनी म्हटले की, ‘ज्या पक्षासाठी आणि ज्या नेत्यांसाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केला त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली. गेली तीन वर्ष हसन मुश्रीफ हे मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असे सांगत होते मात्र असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारली. माझा स्वाभिमान दुखावलेला आहे मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेक कसली.’
पुढे बोलताना शीतल यांनी म्हटले की, ‘मी केवळ उमेदवारी मिळाली म्हणून राष्ट्रवादी सोडलेली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. मला आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून नेमकं काय झालं याचं कारण विचारलं. त्यांनी सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आश्चर्य व्यक्त केलं. रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांनी देखील माझ्याशी संपर्क करून विनंती केली. मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती, जो माझा बाणा होता तोच शिवसेनेतही राहणार आहे असं शीतल यांनी म्हटलं आहे.’