
आज राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यातील जनतेचे लक्ष महानगर पालिकांच्या निवडणुकीकडे लागले आहे. 15 जानेवारीला राज्यातील 29 महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवसेनेने नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आज एकनाथ शिंदे यांनी ऐरोली विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मेळाव्याला हजेरी लावला होती. यावेळी त्यांनी नगरपरिषदांच्या निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीत देखील शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शिवसैनिकांना केले. या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्यासह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने आणि शीतल कचरे यांचा समावेश होता.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना एकनाथ शिंदेंनी म्हटले की, ‘नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे.
📍 ऐरोली, #नवीमुंबई |
नगरपरिषदांच्या निवडणुकीप्रमाणेच महानगरपालिका निवडणुकीत देखील शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन आज नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर #ऐरोली विभागातील #शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.… pic.twitter.com/ZYHly0Ww6M
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 21, 2025
या निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला आहे. महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर शिवसेनेचा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल. नवी मुंबईसाठी अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सिडकोची घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल व रस्ते प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘तिसरी मुंबई’ ग्रोथ सेंटर यांसारखे हे प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरत आहेत.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, अंकुश कदम तसेच नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.