
राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालांमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. तब्बल 200 पेक्षा जास्त ठिकाणी महायुतीतील पक्षांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे विधान सभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या पदरी निराशा आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल जाहीर होत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आजच्या निकालात विजयी झालेल्या एका नगराध्यक्षाने उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेत ठाकरे गटाकडून विजय मिळवलेले अतुल चौगुले हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अतुल चौगुले यांच्या विजयानंतर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी चौगुले भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. तसेच अतुल चौगुले हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
अतुल चौगुले यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, अतुलच्या रुपाने श्रीवर्धनमध्ये परिवर्तन झाले आहे. त्याचे मी अभिनंदन करतो. अतुल हा आमचा सामान्य कार्यकर्ता आहे, तो आमच्यासोबत येण्यास उत्सुक आहे. मात्र त्याने दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे मला त्याच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करावी लागेल. शिवसेनेने त्यांना श्रीवर्धनमध्ये ताकदीने मदत केली. ती मदत ते आयुष्यभर विसरणार नाहीत. आम्ही गनिमी काव्याने युद्ध केले. त्या युद्धात आमचा जय झाला.
दरम्यान, श्रीवर्धन नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अतुल चौगुले यांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक या ठिकाणी विजयी झाले आहेत. तसेच भाजपचाही 2 नगरसेवकांनी विजय मिळवलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाला याठिकाणी 3 जागा मिळाल्या आहेत. आता अतुल चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.