मोठी बातमी! काँग्रेसला राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, आता आणखी एका काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! काँग्रेसला राज्यात मोठा धक्का, बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2025 | 7:08 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला, महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याच पाहायला मिळत आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसांमध्ये काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले आहेत. एक म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष  प्रतिभा शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जळगावात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तर आज आणखी एक धक्का काँग्रेसला बसला आहे.

काँग्रेसचे सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह  येथे त्यांनी भाजपात प्रवेश केला, यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील उपस्थिती होती, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

डीनर डिप्लोमसी 

दरम्यान दोन दिवसांपूर्वी डीनर डिप्लोमसी देखील पाहायला मिळाली होती, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेत्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं,  यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी  जेवणासाठी गेले होते, त्यानंतर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्या आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, पद असूनही काम करू दिलं जात नव्हतं असा आरोप त्यांनी केला आहे. त्या आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, गेल्या दोन दिवसांमध्ये काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले आहेत.