
गेल्या अनेक दिवसांची प्रतिक्षा अखेर आज संपली आहे, राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला आहे. तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. राज्यात महायुतीचे नगराध्यक्षपदाचे 214 उमेदवार विजयी झाले आहेत, तर महाविकास आघीडाला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे, भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, भाजपचे तब्बल 117 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांवर असून शिवसेना शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 37 नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं आहे, तर दुसरीकडे मात्र मोठा धक्का देखील बसला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानंच मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या पत्नी इंदुमती भगत आणि राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष धीरज कोळी, तसेच युवक कार्याध्यक्ष संजय कांबळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोबत शिवसेना ठाकरे गटाच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मित्र पक्ष असणाऱ्या अजित दादांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका दिला आहे.
पक्षांतरला वेग
दरम्यान राज्यात महापालिका निवडणुकांची देखील घोषणा झाली आहे, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेची निवडणूक आहे, तर 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतरला देखील वेग आला आहे. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. महाविकास आघाडीमधील अनेक इच्छूक उमेदवार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेना शिंदे गटात देखील पक्षप्रवेश सुरू आहेत.