मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 4:29 PM

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. मात्र या निवडणुका युती आणि आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर?  याचं चित्र अद्याप अस्पष्ट आहे.

त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या देखील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात प्रवेश केला आहे.

मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेते आपल्याच मित्र पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत, आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती.

तर दुसरीकडे आता काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेडीवार यांनी काँग्रेस पक्षात  प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते अशी त्यांची ओळख आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मेळावा पार पडला.  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षला तेलमुले यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  हा ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मनण्यात येत आहे.