
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातून अनेक मोठ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटानं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. मुंबई विमानतळावर मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेत सामील झालेले हे सर्व कार्यकर्ते इंडिगोचे कर्मचारी आहेत.
पक्ष प्रवेशावर सामंत याची प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना उदय सामंत यांनी म्हटलं की, पक्ष प्रवेशापेक्षाही इथल्या इंडिगोच्या संबंधित काही आमच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी होत्या. या सगळ्या कर्मचाऱ्यांची इच्छा होती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना न्याय मिळून देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, त्यासाठी मी इथे आलो आहे, आणि आम्हाला इथे एरपोर्टला जे कार्यालय मिळालं आहे, त्याच्या उद्घाटनासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येणार आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चुक केली नाही, त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. हे राजकीय आरोप आहेत. तसं बघायला गेलं तर रामदास भाई असतील किंवा योगेशजी असतील त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण केली आहे, आणि हीच प्रतिमा आता मलिन करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे, असं यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे.