शरद पवारांचा प्रमुख शिलेदार शिवसेनेच्या वाटेवर? नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, दरम्यान आता आणखी एक धक्का बसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांचा प्रमुख शिलेदार शिवसेनेच्या वाटेवर? नेत्याच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण
| Updated on: Aug 06, 2025 | 5:05 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला, महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तब्बल 232 मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे, अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. दरम्यान आता आणखी एक मोठा धक्का शरद पवार गटाला बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माळशिरसचे नेते आणि माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी केलं आहे, या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उत्तम जानकर यांनी सोलापूरमध्ये आयोजित एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. कर्णानंतर एकनाथ शिंदे हे दुसरे दानी व्यक्ती आहेत. आपण 40 वर्ष राजकारणात आहोत, दुसऱ्या पक्षात आहोत, पण शिंदेंसारखा दिलदार माणूस आपण पाहिला नाही, असं वक्तव्य जानकर यांनी केलं होतं. दरम्यान जानकर यांच्या या वक्तव्यानंतर आता  माजी आमदार हनुमंत डोळस यांचे सुपुत्र संकल्प डोळस यांनी  जानकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जानकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  डोळस यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत, ईव्हीएमच्या मुद्द्यावर त्यांनी मोठं आंदोलन देखील उभारलं होतं. बॅलेटवर मतदान घेण्यात यावं अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी सोलापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.