
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बडा नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकीकडे नाशिकमध्ये दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, त्यानंतर त्यांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. आज शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे, याबाबत स्वत: चंद्रहार पाटील यांनी माहिती दिली आहे. ‘माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतली नाही, शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा ,पक्ष सोडायचा याबाबतचा अजून निर्णय घेतला नाही, सध्या मी बाहेरगावी असून माझ्या कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन.’ असं चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, या मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे या निवडणुकीत सांगलीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र तरी देखील उद्धव ठाकरे हे सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम होते. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत विशाल पाटील हे विजयी झाले.