मोठी बातमी! आता निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई, शरद पवारही मैदानात, संजय राऊत यांची सर्वात मोठी घोषणा

आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे, निवडणूक आयोगाविरोधात आता विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मोठी बातमी! आता निवडणूक आयोगाविरोधात आर-पारची लढाई, शरद पवारही मैदानात, संजय राऊत यांची सर्वात मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2025 | 4:33 PM

आज मुंबईमध्ये विरोधी पक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे, येत्या 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

एक नोव्हेंबरला शनिवारी निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गावा गावातून जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत, आणि मतदारांची जी ताकद आहे, ती देशांच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष  शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव  ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांविरोधात सर्व विरोधी पक्ष लढाई लढत आहेत. ही लढाई आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये लढत आहोत. त्यानंतर आता ही लढाई महाराष्ट्रातही सुरू झालेली आहे. त्यातून काय साध्य होईल, याबाबत शंका आहे. आजच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फार मोठा मेळावा गोरेगावला पार पडला आणि तिथे राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले, त्यांनी सांगितलं मतदान करा किंवा करू नका, निवडणूकीचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे, आणि या मॅच फिक्सिंगविरोधातच आपली ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीमध्ये आजही 96 लाख बोगस मतदार आहेत, म्हणजे जवळपास एक कोटी, हे एक कोटी मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत, आणि या घुसखोरांना मतदार यादीतून बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज आहे, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेतली होती, त्यानंतर आता एक नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा निघणार असल्याची घोषणा विरोधकांकडून करण्यात आली आहे, त्यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापण्याची शक्यता आहे.