
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावातील रहिवाशी असलेले हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घडना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचे जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपये थकले होते, शासनाकडून वेळेत पैसे मिळत नसल्यानं त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या प्रकरणात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.
हर्षल पाटील प्रकरणावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील व सांगली जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी हर्षल पाटील हे आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. मात्र तांदूळवाडी या गावातील जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेल्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या फलकावर स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल अशोक पाटील व अक्षय अशोक पाटील यांची नावं नमूद आहेत. या प्रोजेक्टचे उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील, मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे सर्व मान्यवर या प्रोजेक्टचे आणि हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे साक्षीदारी असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठा दावा केला आहे. हे कंत्राट दुसऱ्याच कंत्राटदाराला देण्यात आलं होतं, त्यांनी सब कंत्राटदार नेमला होता. आमचा संबंध येते तो मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी, उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं. तुमचे बिल येतील तसे आम्ही पैसे देऊ, समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कंत्राटदार नेमलं असेल, तर सब कंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे, समोर आलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनंतर्गत केलेल्या कामाचे पैसे थकले होते, पैसे वेळेत मिळत नसल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचल्याची माहिती समोर आली आहे.