Ladki Bahin Yojna: राज्य सरकारचा मोठा निर्णय! अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना… नेमकं काय?
Ladki Bahin Yojna: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे. मात्र, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया केली नाही त्यांची नावे या योजनेतून काढून टाकण्यात आली होती. आता या प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, अथवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली गेली होती, अशा महिलांना आपली कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे करण्यात आले होते. मात्र तांत्रिक चुका आणि अपूर्ण कागदपत्रांमुळे लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती. दुरुस्तीसाठी दिलेली ३० एप्रिलची मुदत संपल्यानंतरही अनेक महिला आवश्यक कागदपत्रे जमा करू शकल्या नव्हती. त्यामुळे आता प्रशासनाने एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये या सामाजिक उद्देशाने ही विशेष सवलत जाहीर केली आहे.

ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणांमुळे बंद झाला आहे, त्या आता थेट आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात. तिथे या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि त्यात पात्र ठरणाऱ्या महिलांचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.

दरम्यान, राज्य सरकारने नुकताच १४ आणि १५ मे रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचा मिळून एकूण ३ हजार रुपयांचा हप्ता थेट वर्ग केला आहे, ज्यामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

दुसरीकडे, सरकारच्या कठोर पडताळणी प्रक्रियेदरम्यान जवळपास ६६ ते ७६ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिला, चुकीची माहिती देणारे अर्ज आणि दुहेरी नोंदणी (Double Registration) झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे.

प्रशासनाने आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपली डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली असून, ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे.