
राज्यात सध्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला देखील वेग आला आहे. भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, यावरून महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचं पहायला मिळत आहे, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला होता. दरम्यान या निवडणुकीनंतर राज्यात लगेचच महापालिका निवडणुकांची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे, त्यानंतर आता महायुतीमध्ये देखील मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे, आता नेमका त्यावरच भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
आमची भूमिका ठाम आहे, नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व असलं तरी गंभीर आरोप आहेत. आम्ही तडजोड करु शकत नाही. महायुतीमध्ये मुंबईत एनसीपी नसावी अशी आमची भूमिका आहे. त्याबद्दल आम्ही आमची भूमिका वरिष्ठांना सांगीतली आहे. नवाब मलिकांसंदर्भात कोर्टाने निर्देश दिले आहेत, त्यामुळे आम्ही युती करू शकत नाहीत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता भाजपनं घेतलेल्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेत भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार का? की डच्चू मिळणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान भाजपने घेतलेल्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. नवाब मलिक हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे ती योग्यच आहे. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. एकमेकांवर टीका न करता आम्ही या निवडणुकांना पुढे जात आहोत, महायुतीमध्ये कुठलीही फूट नसून आमची महायुती भक्कम आहे, असं यावेळी पटेल यांनी म्हटलं आहे.