बंदूक, हॉकी स्टीक अन्.., अजितदादा महिला आयपीएस व्हिडीओ कॉल प्रकरणात मोठं ट्विस्ट, आधी नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

बंदूक, हॉकी स्टीक अन्.., अजितदादा महिला आयपीएस व्हिडीओ कॉल प्रकरणात मोठं ट्विस्ट, आधी नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2025 | 3:25 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अजित पवार हे पोलीस अधिकारी असलेल्या अंजना कृष्णा यांना चांगलाच दम भरत असल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत असून, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे प्रकरण सोलापूरच्या माढा तालुक्यातील कूर्डू गावात घडले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संवादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अजित पवार हे अंजना कृष्ण यांना चांगलेच फटकारताना दिसून येत आहेत. हे प्रकरण माढा तालुक्यातील कूर्डू गावातील आहे. या गावात अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती, मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार आणि तलाठी कारवाईसाठी तिथे हजर झाले, त्यानंतर करमाळा उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा या देखील आपल्या पथकासह तिथे पोहोचल्या, यावेळी अजित पवार आणि त्यांच्यामधील संवादाचा हा व्हिडीओ आहे.

दरम्यान ही घटना जिथे घडली, तिथे नेमकं त्यापूर्वी काय घडलं होतं? या संदर्भात आता तेथील ग्रामस्थ आणि प्रत्यक्षदर्शिंनी प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. कृष्णन यांच्या बॉडी गार्डनं बंदुक लावली आणि महसूलच्या कर्माचऱ्यांनी हॉकी स्टीक आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अगोदरच रस्त्यांची बिकट अवस्था आहे, आणि त्यातच अंजना कृष्णन यांनी कारवाई केल्यानं शा‍ब्दिक खंडाजंगी झाल्याचा दावा ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे.

दरम्यान तहसीलदारांचे नाव घेऊन फोनवरून मंडळ अधिकाऱ्यांनं कृष्णन यांचा गैरसमज केला, यामधून हे सर्व घडल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे. दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा प्रांत कार्यालयावर बांगडी मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे. आमच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई होत असल्यानं तसेच आमचं म्हणणं मॅडम ऐकत नसल्यानं अजित पवार यांचा कार्यकर्ता असलेल्या बाब जगताप यांनी अजित पवार यांना फोन लावल्याची माहितीती यावेळी एका प्रत्यक्ष दर्शिनी दिली आहे.