
बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती, या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले, राज्यात संतापाची लाट होती, या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र पुन्हा एकदा बीडमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. परळीमध्ये शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली, या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. शिवराज दिवटे असं या तरुणाचं नाव आहे.
एका टोळक्याकडून आधी शिवराज याचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला रत्नेश्वर डोंगरावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, बांबू आणि काठीनं मारहाण करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आता नवं ट्विस्ट आलं आहे. बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे याला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. त्याने दिलेल्या फिर्यादीमध्ये जलालपूरमध्ये झालेल्या मारहाणीचा उल्लेख आहे. जलालपूरमध्ये समाधान मुंडे आणि ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीचा देखील एक व्हिडीओ आता समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये ऋषिकेश गिरी आणि समाधान मुंडे यांना लाथा बुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण सुरू असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या मारहाणीचं कनेक्शन शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीशी असावं असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आता त्या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
अखंड हरिनाम सप्ताहून गावी परत जात असताना संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे याला टोळक्याकडून अडवण्यात आले, त्यानंतर त्याला बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरात बेदम मारहाण करण्यात आली. जर वेळीच लोक आले नसते तर मी वाचलो नसतो असं शिवराज दिवटे याने म्हटलं आहे.