काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवली, भाजप आक्रमक; डोंबिवलीत साडी पुराण रंगलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर कारवाई केली. पंतप्रधान मोदींचा साडीतील फोटो व्हायरल झाल्याचा निषेध करत भाजपने पगारे यांना भररस्त्यात साडी नेसवली.

काँग्रेस नेत्याला भररस्त्यात साडी नेसवली, भाजप आक्रमक; डोंबिवलीत साडी पुराण रंगलं
Dombivali Sadi
| Updated on: Sep 23, 2025 | 8:04 PM

डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर कारवाई केली. पंतप्रधान मोदींचा साडीतील फोटो व्हायरल झाल्याचा निषेध करत भाजपने पगारे यांना भररस्त्यात साडी नेसवली. या घटनेनंतर डोंबिवलीपासून कल्याणपर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांनी देखील निषेध व्यक्त करत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधानांचा एक फोटो फॉरवर्ड केला होता. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणाचा निषेध करत भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रकाश पगारे यांचा शोध घेऊन भररस्त्यातच त्यांना साडी नेसवली.

भाजपकडून या निषेधाला ‘साडी सत्कार’ असं नाव देण्यात आलं होतं. कार्यकर्त्यांनी इशारा दिला की, ‘पुन्हा असा प्रकार घडल्यास भाजप स्टाईल दाखवू.’ या कारवाईपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले की, ‘पंतप्रधानांचा अपमान करणारी पोस्ट टाकणं निंदनीय आहे. भाजप हा प्रकार सहन करणार नाही. म्हणूनच साडी नेसवून निषेध केला,”

मात्र या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपच्या या निषेधानंतर काँग्रेसमध्ये संताप पसरला. काँग्रेस पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर बोलताना काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी म्हटले की, “मी फक्त पोस्ट फॉरवर्ड केली होती. हा माझा अपमान नाही, पण भाजपने जातीवाचक शिवीगाळ केली. माझ्यावर दबाव टाकला, पण मी डगमरणार नाही. काँग्रेससाठी जीव गेला तरी चालेल, पण या गुन्हेगारांना मी धडा शिकवणार.”

या संपूर्ण प्रकारावर बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले की, “72 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला रस्त्यावर साडी नेसवून अपमान केला. हे कृत्य लाजिरवाणं आहे. यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही आंदोलन केलं पण विरोधकांना कधीही अशा पद्धतीने मारहाण केली नाही. भाजपकडे हिंमत असेल तर ज्यांनी पोस्ट केली त्यांना सामोरे जावं.”

दरम्यान, या घटनेनंतर साडी नेसविणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ डीसीपी कार्यालयात गेले होते. यावेळी डीसीपी यांच्यासोबत चर्चा करताना मामा पगारे यांचा बीपी वाढला, बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.