
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणुकांची देखील घोषणा झाली आहे. महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीने युतीचा जो पॅटर्न ठेवला होता, तोच पॅटर्न पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीमध्ये देखील कायम ठेवला जाण्याची शक्यात आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार आहे, तर काही ठिकाणी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची देखील युती होऊ शकते. तर काही ठिकाणी हे तीनही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जळगाव महापालिका निवडणुकीत काल भाजप आणि शिवसेनेकडून युती जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही युती जाहीर होत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला लांब ठेवत डावल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बैठकीसाठी आम्हाला बोलावले नाही, का बोलावले नाही माहिती नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यानी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट घेऊन चर्चा केल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. महायुतीत राष्ट्रवादी 26 जागांवर ठाम आहे, 12 जागांवर तडजोड करू, त्यापेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. सन्मानकारक जागा मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटासोबत जाऊ असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला आहे. दरम्यान त्यामुळे आता जळगावमध्ये काय होणार? भाजप आणि शिवसेना यांचीच युती होणार की तीनही पक्ष एकत्र लढणार? अजित पवार गट शिवसेन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.