विरोधानंतरही भाजपमध्ये पक्षप्रवेश, देवयानी फरांदे भावुक, म्हणाल्या जर कार्यकर्त्यांचा बळी…
आज नाशिकमध्ये भाजपात मोठा पक्षप्रवेश झाला आहे, स्थानिक भाजपच्या नेत्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध होता, मात्र या विरोधानंतरही पक्षप्रवेश झाल्यामुळे आमदार देवयानी फरांदे चांगल्याच भावुक झाल्या.

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे, आता नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत होता. मात्र या विरोधानंतरही या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. भाजपच्या आमदार आणि नेत्या देवयानी फरांदे यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती, या दोघांना पक्षात प्रवेश देताना आपल्या सोबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असं फरांदे यांनी म्हटलं आहे, तसेच या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना त्या चांगल्याच भावुक देखील झाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल्या फरांदे?
मी विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं, त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश झाला होता. आणि आमचे जे उर्वरीत उमेदवार होते, त्यांना घेऊन शेलार यांच्यासह जर पॅनल केलं असतं तर ते शंभर टक्के निवडून येणार होते, असं लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं मत होतं. त्यामुळे कोणच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्याचं माझं कारण नाही, वर्षानुवर्ष कार्यकर्ते त्या ठाकाणी काम करतात, आणि ते निवडून येण्याचे संकेत दिसत आहेत, असं मला लोकप्रतिनिधी म्हणून वाटत होतं. या ठिकाणी बाहेरून आलेला एक आणि इतर जर तीन दिले तर निश्चित स्वरुपात पक्ष विजयी होईल, त्यासाठी मी आजची भूमिका मांडली होती. तुम्ही सर्व जण मला ओळखता, मी गेल्या चाळीस वर्षांमध्ये माझ्यावर कधी अन्याय झाला असेल, पक्षाने काही भूमिका घेतली असेल तरी देखील मी माझ्या स्वत:साठी कधीही भूमिका घेतली नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे भूमिका मी कधीही घेणार नाही, परंतु सर्वांनीच नेते व्हायचं, आणि प्रत्येकाने आप आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कोणी पाठबळ द्यायचं? असा सवालही यावेळी देवयानी फरांदे यांनी केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की त्यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली, एवढाच विषय आहे. मला गहिवरून येण्याचा कारण म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे, आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे काही मला बरोबर वाटलं नाही. जे आज पक्षात आले आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते. पण आज जे घडलं ते मला काही आवडलेलं नाही, अशा शब्दांमध्ये फरांदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
