राऊत म्हणाले, ‘दादर ते दादरा शिवसेनेचा भगवा’, चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘काही नाही फक्त सहानुभूतीची लाट!’

| Updated on: Nov 04, 2021 | 11:52 AM

जर दादरामध्ये शिवसेनेला बघून मतदान झालं असेल तर इथून पुढच्या निवडणुका शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात आणि जिंकाव्यात, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी सेनेला दिलं.

राऊत म्हणाले, दादर ते दादरा शिवसेनेचा भगवा, चंद्रकांत पाटील म्हणतात, काही नाही फक्त सहानुभूतीची लाट!
कलाबेन डेलकर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने भगवा फडकवला. दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया केली. शिवसेनेच्या दैदिप्यमान विजयानंतर नेतेमंडळी सेना पक्षनेतृत्वाचं आणि खासदार संजय राऊत यांचं कौतुक करतायत, त्यांना शुभेच्छा देतायत. इकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या विजयाचं दोन शब्दात वर्णन केलंय. दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा विजय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ सहानुभूतीची लाट आहे, असं ते म्हणाले.

शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन!

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह लगतच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं तर 2 नोव्हेंबरला तारखेला मतमोजणीही झाली. या निवडणुकीत सेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 51 हजार मतांनी पराभव केला.

दुसरं तिसरं काही नाही, फक्त सहानुभूतीची लाट!

डेलकर कोण आहेत? डेलकर काय शिवसेनेचे लहानपणापासूनचे सदस्य आहेत? डेलकरांनी आत्महत्या केल्यानंतर जी सहानुभूतीची लाट होती, ती शिवसेनेने कॅच केली एवढंच खरं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या विजयावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली.

तर मग तिथे तुमच्याच चिन्हावर लढा आणि जिंका!

जर दादरामध्ये शिवसेनेला बघून मतदान झालं असेल तर इथून पुढच्या निवडणुका शिवसेनेने त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात आणि जिंकाव्यात, असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी सेनेला दिलं. शेवटी राजकारणात अशा गोष्टी होत असतात. आम्ही केलं तर वाईट, तुम्ही केलं की चांगलं, असं होत नसतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एका विजयाने थेट दिल्लीच्या गप्पा हास्यास्पद, राऊतांना टोला

डेलकर याअगोदर सात वेळा खासदार राहिले, ते ही वेगवेगळ्या चिन्हावर, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येनंतर सहानुभूती होती. ती मिळाली. पण एका विजयाने लगेच उद्धवजी दिल्लीला वगैरे जाणार, असं स्टेटमेंट करणं हास्यास्पद आहे. जाण्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, त्यांनी जावं. पण लोकांना असली स्टेटमेंट आवडत नाहीत, लोक हसतात, असे चिमटे चंद्रकांतदादांनी काढले.

दादर ते दादरा सेनेचा भगवा, राऊत अग्रलेख काय म्हणाले?

“महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. कलाबेन डेलकर या 51,269 इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. हा विजय ऐतिहासिक आहे. मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक देईल”, असं राऊत अग्रलेखात म्हणाले होते.

(BJP Chandrakant Patil Comment on Dadra Nagar haveli Bypoll Election Kalaben Delkar defeat BJP Candidate)

हे ही वाचा :

दादरा नगर हवेलीवर सेनेचा भगवा, कलाबेन डेलकर यांची विजयी डरकाळी, शुभेच्छा देताना दरेकरांकडून टोले आणि टोमणे