भाजप जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांवरुन ‘नाराजीनाट्य’, काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यास जिल्हाध्यक्षपद, सोशल मीडियातून रंगली चर्चा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु त्यावरुन नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. सोशल मीडियावर काही नियुक्त्यांवर चर्चा रंगली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून दोन आठवड्यांपूर्वी ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर झाले होते. परंतु उर्वरित यादी स्थानिक मतभेदांमुळे रखडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण व केंद्रीय नेत्यांशी चर्चा करुन यादी निश्चित करण्यात आली. आता भाजपने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. परंतु यानंतरही पक्षातील मतभेद समोर येऊ लागले आहे. कधी काँग्रेसमध्ये ग्रामविकास मंत्री असलेले बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष केले आहे. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री असलेले बसराज पाटील यांना भाजपने लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष केले आहे. बसवराज पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील रहिवाशी आहेत. ते 1999 साली उमरगा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपमध्ये आले. आता कधी मंत्री राहिलेल्या बसवराज पाटील यांच्याकडे भाजपाने लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षाची धुरा सोपवली. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बसवराज पाटील यांचे कार्यकर्ते ही नाराज आहेत. दुसरीकडे त्यांच्या पुर्वीच्या काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही बसवराज पाटील यांच्यावर टीका सुरु केली आहे.
भाजपकडून २२ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या
भाजपने जिल्हाध्यक्षांची रखडलेली यादी जाहीर केली आहे. पक्षातंर्गत नाराजी दूर करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. भाजपने जिल्हाध्यक्षांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये या पदासाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे उर्वरित नावे निश्चित करण्याआधी पुन्हा स्थानिक नेते, आमदार-खासदार आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. परंतु आता नियुक्तीनंतरही नाराजी आहे. मुंबईतही काही नावांना विरोध झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, यादृष्टीने सर्व संबंधितांशी प्रदेश पातळीवरून समन्वय साधण्यात येत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
