शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते, त्यामुळे भाजपने…; बड्या नेत्याची मोठी मागणी

कल्याण-डोंबिवलीत युतीची चर्चा सुरू असताना भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर खंजीर खुपसल्याचा आरोप करत १२२ जागा स्वबळावर लढण्याचे आवाहन केले आहे.

शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते, त्यामुळे भाजपने...; बड्या नेत्याची मोठी मागणी
| Updated on: Dec 24, 2025 | 3:38 PM

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. स्थानिक पातळीवर मात्र भाजपमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीतच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर खंजीर खुपसल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. शिवसेनेवर विश्वास ठेवणे कठीण असून, भाजपने महापालिकेच्या सर्व १२२ जागा स्वबळावर लढाव्यात, अशी आग्रही मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

त्यांच्यावर विश्वास ठेवणे आता अशक्य

कल्याण पूर्वेमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जगन्नाथ पाटील अत्यंत आक्रमक रूपात पाहायला मिळाले. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. युतीमध्ये राहून सोबत काम करायचे आणि ऐन निवडणुकीत पाठीमागून खंजीर खुपसायचा, हा अनुभव आम्ही वारंवार घेतला आहे. अशा विश्वासघातकी राजकारणामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे आता अशक्य झाले आहे,” असे पाटील यांनी स्पष्टपणे बजावले.

जगन्नाथ पाटील यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ २०१९ आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची उदाहरणे दिली आहेत. गणपत गायकवाड हे अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेने धनंजय बोराडे यांना बंडखोर म्हणून उभे केले आणि त्यांना पूर्ण रसद पुरवली. तरीही भाजप कार्यकर्त्यांच्या जिद्दीवर गायकवाड निवडून आले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांना उभे करण्यात आले. त्यांना मिळालेली ५४ ते ५५ हजार मते ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वळवलेली मते होती. बंडखोरी करणाऱ्याला नंतर चारच महिन्यात पक्षात परत घेणे, हा आमचा विश्वासघात नाही का?” असा सवाल जगन्नाथ पाटील त्यांनी उपस्थित केला.

रवींद्र चव्हाणांना आवाहन

कार्यकर्त्यांच्या उत्साहाला वाट करून देताना पाटील यांनी मांडले की, भाजपची ताकद कल्याण-डोंबिवलीत प्रचंड आहे. “आपण कधीच कुणाच्या पाठीत वार केला नाही, पण आपल्याला लक्ष्य केले जात असेल तर आपणही मागे हटता कामा नये. कार्यकर्त्यांची ताकद पाठीशी असेल तर कोणाचीही हिंमत नाही आपल्याला पराभूत करण्याची. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व १२२ जागांवर आपले उमेदवार उभे करावेत,” असे आवाहन त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासमोर केले.

जगन्नाथ पाटील यांच्या या विधानामुळे युतीच्या वाटाघाटीत आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा दबाव वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावर आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.