डिलिमिटेशन विधेयकासाठी भाजपचा राष्ट्रवादीच्या खासदारांवर डोळा? पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट; नेमकं गणितच सांगितलं
Prithviraj Chavan Reveals BJP Political Strategy: राष्ट्रवादीच्या राजकारणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर त्यांनी विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी सरकारला डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्याची घाई आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांवर लक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. पुढील दोन ते तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या राजकारणातील चित्र स्पष्ट होईल, असेही चव्हाण म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जोर धरला आहे.
या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत या घडामोडींवर आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या विलीनीकरणाच्या चर्चेमागे केंद्रातील राजकीय गणित असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
नरेंद्र मोदी सरकारला डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक आणण्याची घाई झाली आहे. महिला विधेयकाच्या नावाखाली सरकारला परिसीमन करायचे आहे. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला १५ ते १६ मतांची कमतरता भासत असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळेच भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांवर लक्ष असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना चव्हाण म्हणाले की, त्यांची राजकीय पार्श्वभूमी नेहमीच डाव्या विचारसरणीकडे झुकणारी राहिली आहे.
ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार त्यांनी सातत्याने मांडले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तो वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला निर्णय मानला जाईल. आमदारांच्या दबावाखाली सत्तेच्या जवळ जायचे का, हा शरद पवार यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, शरद पवार यांचा गट NDA सोबत जाणार नाही, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊन पक्ष NDA सोबत गेल्यास त्याचा भारतीय राजकारणासह इंडिया आघाडीवरही परिणाम होईल. देशात दोन विचारधारा कायम राहतील. एक हिंदुत्वाची, तर दुसरी समतेचा विचार मानणारी विचारधारा असेल, असे ते म्हणाले.
भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्यात आली, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे ते म्हणाले. मात्र, NDA मध्ये सहभागी न होता डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादीकडून पाठिंबा दिला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व कोण करणार, पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर सर्वांनी एकत्र यावे, अशा चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे सत्तेसोबत गेले पाहिजे, असा दबाव आमदार आणि खासदारांकडून पक्षावर असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनाच्या घोषणेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे अधिवेशनाबाबत लवकर निर्णय अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके काय घडणार, याचे चित्र पुढील दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होईल, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी या राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.