Pandharpur Temple: पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचे नियम बदलणार! भक्तांना वस्त्रसंहिता लागू होणार; आता भारतीय आणि वारकरी वेशभूषेतच प्रवेश मिळणार?
Pandharpur Temple Dress Code for Foreign Visitors: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी परदेशी भक्तांना वस्त्रसंहिता लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय आणि वारकरी परंपरेतील पोशाख अनिवार्य आहे.

पंढरपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या परदेशी भक्तांसाठी आता वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या परदेशी भाविकांना भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेनुसार पारंपरिक पोशाख परिधान करावा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पारंपरिक पोशाख परिधान केल्यानंतरच परदेशी भक्तांना थेट दर्शनासाठी प्रवेश देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने ठराव करून मंदिर समितीकडे दिला आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसह वर्षभर देश-विदेशातून लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. यामध्ये परदेशी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. मात्र, मंदिरातील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने परदेशी भाविकांसाठी विशिष्ट वस्त्रसंहिता असावी, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
या प्रस्तावानुसार परदेशी भक्तांनी विठ्ठल दर्शनासाठी येताना भारतीय किंवा वारकरी परंपरेला साजेसा पारंपरिक पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताना कपड्यांबाबत काही नियम लागू होऊ शकतात. मात्र नेमका कोणता पोशाख बंधनकारक असेल, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कपड्यांचा समावेश असेल आणि नियमांचे पालन कसे केले जाईल, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
या वस्त्रसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून एसओपी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या एसओपीमध्ये वस्त्रसंहितेचे नियम, दर्शनासाठी प्रवेशाची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील आवश्यक बाबी निश्चित केल्या जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने केलेल्या ठरावानंतर आता मंदिर समिती काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वस्त्रसंहितेचा अंतिम आराखडा तयार झाल्यानंतरच या नियमांची अंमलबजावणी कधीपासून आणि नेमकी कशा पद्धतीने होणार, हे स्पष्ट होईल. त्यामुळे परदेशी भक्तांसाठी विठ्ठल दर्शनाच्या नियमांत बदल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या निर्णयाची चर्चा होत आहे.
