…तर मनसेच्या अॅक्शनला रिअॅक्शन देणार, भाजप नेत्याचा मराठी भाषेवरून मोठा इशारा, वातावरण तापलं
रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आता आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. आता भाजप आणि मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलणं सक्तीचं करण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना 15 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. 15 ऑगस्टनंतर ज्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडे मराठी भाषेचं प्रमाणपत्र नाही, त्यांच्यावर आरटीओच्या वतीने कारवाईला सुरुवात देखील झाली होती. मात्र या कारवाईला परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी चालकांच्या वतीने मोठा विरोध झाला. अखरे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली मुदत वाढवली आहे. आता रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.
दरम्यान मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये भाजपा रिक्षा युनियनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात आला आहे. ढोल-डीजेच्या तालावर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. जर मनसेवाले कोणत्याही उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर काही कारवाई करतील तर त्याच अंदाजात प्रत्युत्तर अॅक्शनला रिअॅक्शन दिली जाईल घाबरण्याची गरज नाही, असं अभिजीत राणे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राणे?
जर मनसेवाले कोणत्याही उत्तर भारतीय रिक्षा चालकांवर काही कारवाई करतील तर त्याच अंदाजात आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ, असा इशारा अभिजीत राणे यांनी दिला आहे. तसेच रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्ष मुदतवाढ मिळाल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची देखील चर्चा सुरू आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. जेव्हा आमच्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई होत होती तेव्हा आम्ही नाराज होतो, आता ते नाराज आहेत, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे रिक्षा चालकांना आता एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे, मात्र त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदत मिळणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.