पवार साहेब, तुम्हाला दारुवाल्यांचे आशीर्वाद मिळतीलच, पण…; आमदार अनिल बोंडेंचं शरद पवारांना खरमरीत पत्रं

| Updated on: May 12, 2021 | 1:12 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. (BJP Leader Anil Bonde Writes Letter To Ncp Chief Sharad Pawar over farmers issue)

पवार साहेब, तुम्हाला दारुवाल्यांचे आशीर्वाद मिळतीलच, पण...; आमदार अनिल बोंडेंचं शरद पवारांना खरमरीत पत्रं
Anil Bonde -Sharad Pawar
Follow us on

अमरावती: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे. भाजपचे आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही पवार यांना खरमरीत पत्र लिहून जोरदार टीका केली आहे. (BJP Leader Anil Bonde Writes Letter To Ncp Chief Sharad Pawar over farmers issue)

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना हे पत्रं लिहिलं आहे. हे पत्रं बोंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केलं आहे. तसेच या पत्रातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बारा बलुतेदारांच्या समस्यांकडे पवारांचं लक्ष वेधून या वर्गासाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आग्रह धरला आहे.

दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही

पवार साहेब, मुख्यमंत्री फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशीर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं चिमटा बोंडे यांनी या पत्रातून काढला आहे.

वीज बिल माफीसाठी तरी पत्रं लिहा

करोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू. अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणने शेतकरी, शेतमजूर, आणि सामान्यांच्या घराची वीज कापण्यास निर्दयीपणे सुरुवात केली. विधानसभेत दिलेली वीज कापण्याची स्थगिती ऊर्जा मंत्र्यांनी उठवली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कोरोना काळातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहाना, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांसाठी तरी पत्रं लिहा

महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत. करोनामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. शेतातून माल काढूनही विकला जात नाही. काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं सांगतानाच अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळं झालीत. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचं अतोनात नुकसान झालं. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (BJP Leader Anil Bonde Writes Letter To Ncp Chief Sharad Pawar over farmers issue)

 

संबंधित बातम्या:

40 दिवस दुकानं बंद होती, व्यापाऱ्यांचे 50000 कोटी बुडालेत, आता महाराष्ट्र अनलॉक कराच: विरेन शाह

Video: जलनेती केल्यास कोरोना संसर्ग टाळता येतो; नाशिकच्या महापौरांचा प्रात्यक्षिकांसह दावा

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास रुग्ण बरा होतो, अहमदनगरातील डॉक्टरचा अजब फंडा

(BJP Leader Anil Bonde Writes Letter To Ncp Chief Sharad Pawar over farmers issue)