Chandrakant Patil: शरद पवारांनी दरोडा टाकलाय का? भाजपच्या बड्या नेत्याने संजय राऊतांना सुनावलं
शरद पवारांशिवाय संजय राऊत यांचे राजकारण चालत नव्हतं मात्र आता ते बोलू लागलेत. पण त्यांना सुप्रिया वहिनी चांगलं ठणकावले आहे असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे. सांगलीमध्ये ते बोलत होते.

शंकर देवकुळे, प्रतिनिधी: राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांच्यावर चौफेर टिका होत आहे. शरद पवार यांना सतत सत्तेत राहायचे असते असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे तर दुसरीकडे, या देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही निर्णयाला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही असे म्हणत ठाकरे गटानेही राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अशातच आता भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टिकेवरुन महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणालेत चंद्रकांत पाटील?
“शरद पवार यांनी काँग्रेसचे झेंडे ठिक-ठिकाणी रोवले,पण एका दिवसात शरद पवार वाईट झाले ? शरद पवारांनी दरोडा घातलाय का ? असा सवाल भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. डिलिमेटेशनवरून भाजपाला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
“शरद पवार खऱ्याला खरं म्हणलं आहेत, पण तुम्हाला आता प्रॉब्लेम होणार,असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच शरद पवारांशिवाय संजय राऊत यांचे राजकारण चालत नव्हतं मात्र आता ते बोलू लागलेत. पण त्यांना सुप्रिया वहिनी चांगलं ठणकावले आहे असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे. सांगलीमध्ये ते बोलत होते.
राहुल गांधी घेणार शरद पवार यांची भेट!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी राहुल गांधी यांनी मात्र विरोधकांची मनधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे एमके स्टॅलिन यांच्या भेटीसाठी चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी हे डीएमकेंची समजूत काढणार आहेत.
त्यासोबतच राहुल गांधी आज महाराष्ट्रातही येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. डिलिमिटेशनला दिलेल्या पाठिंब्याबाबत फेरविचार करावा असं ते शरद पवार यांना सांगणार आहेत. या भेटीत नेमकं काय घडतंय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
