भाजप आमदार सुरेश धस यांनी केले राष्ट्रवादीच्या या नेत्याचे कौतूक, म्हणाले, ‘पैसे देण्याच्या…’

BJP mla suresh dhas: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांनी ग्रामविकास विभागात वेगळेपण आणले. त्यांनी लोकांना पैसे देण्याच्या योजना आणल्या. आर. आर. पाटील यांनी फुकटच्या योजना आणल्या.

भाजप आमदार सुरेश धस यांनी केले राष्ट्रवादीच्या या नेत्याचे कौतूक, म्हणाले, पैसे देण्याच्या...
| Updated on: Feb 23, 2025 | 4:21 PM

भाजप आमदार सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आले. भाजपमध्ये राहून त्यांनी सरकारविरोधात रान उठवले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर सुरेश धस चर्चेत आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगेसह विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आमदार सुरेश धस रविवारी परंडा दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय आर.आर.पाटील यांचे कौतूक केले. त्यांनी आणलेल्या योजना लोकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्याचे धस यांनी म्हटले.

सुरेश धस काय म्हणाले?

सुरेश धस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना म्हणाले, तुम्ही बिगर पैशांच्या योजना आणा. पैसे द्यावा लागतील अशा योजना आणू नका. यापूर्वी अनेक लोकांनी ग्रामविकास विभाग चांगला सांभाळला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांनी ग्रामविकास विभागात वेगळेपण आणले. त्यांनी लोकांना पैसे देण्याच्या योजना आणल्या. आर. आर. पाटील यांनी फुकटच्या योजना आणल्या. तंटामुक्ती योजनात कोणाला तंटामुक्ती अध्यक्षपद मिळाले तरी लोक खुश झाले होते. जयकुमार गोरे तुम्ही तरुण आहात. तुम्ही आता आर.आर.पाटील यांच्यासारख्या वेगळ्या योजना आणा. काही फुकटच्या योजना आणा. गाव सपाटीकरणाची योजना 25 15 मध्ये समाविष्ट करा.

विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सोबत घड्याळ आणि बाणाला ही लोकांनी मते दिली. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का? असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला.

आमदार सुरेश धस परंडा येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आर.आर. पाटील यांचे कौतूक केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजप १३४ जागांवर गेली आहे. महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाले. कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सारखे असले पाहिजे.

जयकुमार गोरे यांची ग्रामविकास व पंचायतराजमंत्री आणि धाराशिव जिल्हा संपर्कमंत्री निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर पक्षाकडून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार रमेश कराड,आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.