
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरु आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. आता याप्रकरणानंतर भाजपचे आष्टी-पाटोदा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मी एका मोठ्या नेत्याची विकेट पाडली, असे सुरेश धस म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार सुरेश धस हे चिखलीतील येथील नवसाला पावणारी देवी लक्ष्मी मातेच्या नवसपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमासाठी चिखलीत आले होते. यावेळी त्यांची पेढातूला करण्यात आली. या कार्यक्रमात त्यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच यावेळी स्थानिक जनतेने त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.
नागपूरच्या पहिल्याच आधिवेशात मी संतोष देशमुख यांचा मुद्दा मांडला आणि त्याप्रकरणी न्यायच मिळवून घेतला. यात एका मोठ्या नेत्याची विकेटही त्यात पडली. ते पण क्लीन बोल्ड होण्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण त्यांचे सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता, असे सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव न घेतले नाही. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर टीका केली.
आता हे जिंदाबाद ते जिंदाबाद चाललं आहे याच भान जरा राहिले पाहिजे, आपण कोणाचा जिंदाबाद करतोय , हम सब अंगार हे म्हणायचं बाकी भंगार है अशा पद्धतीच्या घोषणा देतात. याला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचा अधिकार आपल्याला आहे का, असा सवालही सुरेश धस यांनी केला.
एक लाख ४१ हजार मतदारांनी मला मतदान दिलं, ही माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे. माझा कोणताही कारखाना नाही, संस्था नाही किंवा मी कोणताही सम्राट नाही. पण, जनतेच्या मनावर प्रेम करणारा मी नक्कीच सम्राट आहे. काही लोक निवडून आल्यावर स्वतःला मालक समजतात आणि डरकाळी फोडतात. पण, आम्ही जनतेचे सालकरी आहोत आणि आम्ही तसेच राहिलो पाहिजे. छाताड फुगवणारे आणि लॉकेट घालणारे विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत, असेही सुरेश धस यांनी म्हटले.