
अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. अकोला महानगरपालिकेत भाजप सत्तास्थापन करणार आहे. शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव केला होता. शारदा खेडकर यांना 45 मतं मिळाली आहेत. अकोला महानगरपालिकेत भाजपने काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. भाजपविरोधात आम्ही सारे असा प्रयोग ऐन भरात असताना आता भाजपने डावच पलटला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितसह इतर पक्षांनी भाजपविरोधात प्रयोगाची चाचपणी केली होती. परंतु संख्याबळाच्या जोरावर भाजपने बाजी मारली असून अकोला महानगरपालिकेत इतर पक्षांची डाळच शिजली नाही.
अकोला महानगरपालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 38 जागांचं बहुमत होतं. तर काँग्रेसकडे 21 नगरसेवक होते. 41 जागांसाठी भाजपला फक्त तीन जागा हव्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने बहुमताचं गणित जुळवल्याने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर याच आघाडीचा उमेदवार विराजमन होणार, हे जवळपास निश्चित झालं होतं.
दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सत्ता आमचीच येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत होता. आमच्याकडे संख्याबळ असून 41 च्या वर दोन नगरसेवक आमच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी गुरुवारी केला होता. त्यामुळे अकोल्यात महापौरपदाची बाजी नेमकी कोण मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर याचा अंतिम फैसला आज मतदानातूनच स्पष्ट झाला असून भाजपने सर्वांनाच मात दिली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला होता. त्याच्या 15 दिवसांनंतर आता राज्याला पहिला महापौर मिळाला आहे.
भाजपविरोधात महापालिकेत मोट बांधण्याचा प्रयत्न वंचितने केला. पण संख्याबळाचा आकडा जमविण्यात मोठी अडचण होती. कारण वंचितचे 5, एमआयएमचे 3, अपक्ष 2, दोन्ही राष्ट्रवादींचे 4, काँग्रेस 21 असा मेळ जमवूही 41 हा बहुमताचा आकडा जमविणं अवघड होतं. त्यातच नगरसेवक पळवापळवचीही भीती होती. गेल्या एका आठवड्यापासून शहर महापालिकेसाठीचा हायहोल्टेज ड्रामा आता संपुष्टात आला आहे. भाजपविरोधात सर्वच पक्ष मोठा खेला करतील असे वाटत असतानाच भाजपने डाव टाकला आहे.
एकूण जागा- 80
बहुमताचा आकडा- 41
भाजप- 38
काँग्रेस- 21
उबाठा- 6
शिंदे सेना- 1
अजित पवार राष्ट्रवादी- 1
शरद पवार राष्ट्रवादी- 3
वंचित- 5
एमआयएम- 3
अपक्ष- 2