
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार अखेर मंगळवारी थंडावला. राज्यातील 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. शेवटच्या चार-पाच दिवसांत तर सर्वच महानगरपालिकांमध्ये गल्लीबोळांत कर्णकर्कश प्रचार करण्यात आला. इतकंच नव्हे तर मतांसाठी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले. आता गुरुवारी मतदान होणार असून त्यादिवशी मतदारांनी काय करावं आणि काय करू नये, याबद्दल जाणून घ्या..
निवडणूक प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याची मुभा आहे. मात्र पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन प्रचार करता येणार नाही. तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि एसएमएसद्वारेसुद्धा प्रचारावर बंदी आहे. सर्व महापालिका आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत.