
Eknath Shinde : राज्यात सध्या महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष जोमात प्रचार करत आहेत. अवघ्या तीन दिवसांवर मतदानाचा दिवस आल्यामुळे प्रचारासाठी पूर्ण ताकद लावली जात आहे. मुंबई जिंकण्यासाठी तर राज्यातील भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट, शिवसेनेचा शिंदे गट, मनसे यांचा सभांचा धडका चालू आहे. 11 जानेवारी रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यानंतर आता याच मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना चांगलंच घेरलं. ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक फोडल्याचा उल्लेख करून शिंदे यांन मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवरही टीका केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर बोलताना शिंदे म्हणाले की, वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणत आहेत. मग २० वर्षापूर्वी एक का झाले नाही. तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही. तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता. कालपरवापर्यंत एकमेकांवर काय बोलले ते आठवा. स्वार्थासाठी वेगळे झालेय स्वार्थासाठीच एकत्र आले. सोबतच पुढे बोलताना मराठी माणसाच्या नावाने खोटं प्रेम दाखवत आहेत. हे पुतणा मावशीचं प्रेम आहे. आम्ही साडेतीन वर्षात काय केलं ते पाहा. २० वर्षात आम्ही विचारांची भूमिका घेतली. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करता, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तसेच तुम्ही तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा किती दान दक्षिणा घेतली ते सांगा, असा सवालही शिंदे यांनी केला.
२५ वर्ष मुंबईला लुटणारे भ्रष्टाचारावर बोलत आहात. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही. आम्ही कार्यकर्त्यापासून पुढे आलो. आम्ही तुमचं काही घेऊन गेलो नाही. आम्ही मंत्रिपदावर लाथ मारून गेलो. सत्ता सोडून गेलो. आमचं सरकार स्थापन झालं. मराठी माणसाच्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं, असेही शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.