ऐन दिवाळीच्या तोंडावर BOSCH ने नाशिकमध्ये 730 कामगार काढले; 530 जणांना सक्तीची ‘व्हीआरएस’

| Updated on: Oct 28, 2021 | 4:20 PM

नाशिकच्या उद्योग जगतात मानाचे पान असणाऱ्या BOSCH कंपनीने आपल्या 730 कामगारांना ऐन दिवाळीच्या तोंडावर घरचा रस्ता दाखवला आहे. तर 530 कामगारांना सक्तीची 'व्हीआरएस' दिला आहे. त्यामुळे उद्योगनगरीतल्या कामगार वर्गांमध्ये पराकोटीचा संताप आणि चलबिचल आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर BOSCH ने नाशिकमध्ये 730 कामगार काढले; 530 जणांना सक्तीची व्हीआरएस
नाशिकमधील बॉश कंपनी.
Follow us on

नाशिकः नाशिकच्या उद्योग जगतात मानाचे पान असणाऱ्या BOSCH कंपनीने आपल्या 730 कामगारांना ऐन दिवाळीच्या तोंडावर घरचा रस्ता दाखवला आहे. तर 530 कामगारांना सक्तीची ‘व्हीआरएस’ दिली आहे. त्यामुळे उद्योगनगरीतल्या कामगार वर्गांमध्ये पराकोटीचा संताप आणि चलबिचल आहे.

देशभरात मोदी सरकारने एक ऑक्टोबरपासून नवीन कामगार कायदे लागू केले. जुने कामगार कायदे मोडीत काढले. त्याचा पहिला घाव नाशिकमधल्या या 730 कंत्राटी कामगारांना बसला आहे, अशी चर्चा कामगार वर्गामध्ये आहे. कंपनीने या कंत्राटी (ओजीटी) कामगारांना काढून त्यांच्या जागी कमवा आणि शिका योजना, निम योजना, डिजिटल कौशल्य विकास आदीमधून दुसरी भरती करण्याचा विचार सुरू केला असल्याचे समजते. त्यामुळे या कामगारांना पीएफ, ईएसआयसीसह इतर कुठल्याही सुविधा लागू करण्याची गरज नाही. सोबतच फक्त दहा हजारांच्या मानधनावर त्यांच्याकडून तीन शिफ्टमध्ये काम करून घेणे शक्य आहे. हा विचार करून ही कामगार कपात केल्याची चर्चा आहे.

मार्चमध्ये केली होती पगारवाढ

नाशिकची मदर इंडस्ट्री म्हणून BOSCH कडे पाहिले जाते. कंपनीने मार्च महिन्यात 473 कामगारांना ऑन जॉब ट्रेनिंगमधून थेट टेंपररी कामगारांचा दर्जा दिला होता. सोबतच सर्व कामगारांना दुप्पट वेतनवाढ देण्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या संकटातही कंपनीने पगार वाढवल्याने कामगार वर्गामध्ये खरे तर आनंद होता. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही, असेच म्हणावे लागेल.

पगारवाढीनेच केला घाव

खरे तर बॉश कंपनी व्यवस्थापने ऐन कोरोनाच्या काळात कामगारांची पगारवाढ केली. त्याचा मोठा गवगवा झाला. मात्र, इथेच खरे पाणी मुरल्याची चर्चा आहे. कारण पूर्वी कामगारांना पगाराशिवाय उत्पादनावर इन्सेटीव्ह म्हणून दहा ते वीस हजारांची रक्कम प्रत्येक महिन्याला मिळायची. नव्या करारात 12 हजारांनी पगार वाढवला. मात्र, त्या बदल्यात ही इन्सेटीव्ह रक्कम बंद केली. मात्र, सुरुवातील एरीएससह पगार झाल्याने हे कामगारांना समजले नाही. मात्र, नेहमीच्या पगारात जेव्हा कपात सुरू झाली, तेव्हा याचे बिंग फुटले.

‘व्हीआरएस’मध्ये धाकदपटशाही

कंपनीने कामगारांना ‘व्हीआरएस’ देतानाही धाकदपटशाही केल्याचे समोर येत आहे. तुम्ही ‘व्हीआरएस’ घ्या. त्याबदल्यात मोठी रक्कम मिळेल शिवाय तुमच्या मुलांना कामावर लावून घेऊ, असे आमिष दाखवले. अनेक कामगारांना धमक्या दिल्याचा आरोपही होत आहे.

प्रतिक्रिया मिळाली नाही

या साऱ्या कामगार कपातीबाबत टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने BOSCH कंपनी व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अधिकारी वर्गाशी प्रत्यक्षात व दूरध्वनीवरूनही संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

इतर बातम्याः

परमबीर सिंह बेनामी मालमत्ता प्रकरणः पुनमियाला जिल्हा व सत्र न्यायालयाचा तूर्तास दिलासा, सुनावणी चार आठवडे पुढे

सामूहिक बलात्काराने नाशिक हादरले; वणी येथे 42 वर्षांच्या महिलेवर अत्याचार, 4 संशयितांना बेड्या