लेकीचं कन्यादान करताना बाप कोसळला अनं काही समजण्याच्या आतच… भर मांडवात नवरीच्या आनंदावर काळाचा घाला

बुलढाणा जिल्ह्यातील वरदडी येथे कन्यादानाचा विधी सुरू असताना वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. बायपास शस्त्रक्रिया होऊनही मुलीच्या लग्नासाठी झटणाऱ्या पित्याचा अंत लग्नाच्या मांडवातच झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

लेकीचं कन्यादान करताना बाप कोसळला अनं काही समजण्याच्या आतच... भर मांडवात नवरीच्या आनंदावर काळाचा घाला
bride
| Updated on: May 15, 2026 | 9:30 AM

सर्वत्र आनंदाचे वातावरण, वाजत-गाजत आलेली वरात, मंगलाष्टकांचे सूर आणि लाडक्या लेकीच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस… पण याच मंगल प्रसंगी नियतीने असा क्रूर डाव साधला की संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी येथे कन्यादान सुरू असतानाच वधू पित्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. कुरुमदास कुंडलिक भुतेकर (५०) असे या मृत पित्याचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नाच्या दिवशी काय घडले?

वरदडी येथील कुरुमदास भुतेकर यांची मुलगी नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा येथील प्रदीप नानोटे यांच्याशी ठरला होता. गुरुवारी सायंकाळी लग्नाचा मुख्य सोहळा सुरू होता. सनई-चौघड्यांच्या सुरात आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडत होता. मंगलाष्टका आटोपल्यानंतर लग्नातील सर्वात भावनिक विधी कन्यादान सुरू झाले. कुरुमदास हे आपल्या मुलीचे हात वरपित्याच्या हातात सोपवत असतानाच अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यानंतर ते लग्नाच्या विधी सुरु असलेल्या ठिकाणी कोसळले.

लग्नाच्या अक्षतांचे रूपांतर आसवांत

सुरुवातीला उपस्थितांना वाटले की कामाच्या ताणामुळे किंवा थकव्यामुळे त्यांना चक्कर आली असावी. नातेवाईकांनी त्यांना तातडीने सावरले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अवघ्या काही मिनिटांपूर्वी आनंदाने नाचणारे वऱ्हाडी आणि अक्षता टाकणारे हात या बातमीने सुन्न झाले होते.

प्रकृतीची होती झुंज

मृत कुरुमदास भुतेकर यांची प्रकृती गेल्या काही काळापासून नाजूक होती. डिसेंबर महिन्यातच त्यांच्यावर एक मोठी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, परंतु आपल्या लेकीचे लग्न स्वतःच्या हाताने लावून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या ओढीत त्यांनी सर्व तयारी केली होती. मात्र त्याच विधीदरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. ज्या घरातून लेकीची आनंदाने पाठवणी होणार होती, त्याच घरातून पित्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याने वरदडी ग्रामस्थांचे डोळे पाणावले. एक बाप आपल्या मुलीला सासरी पाठवताना इतका भावूक झाला की त्याचे हृदय ते सहन करू शकले नाही, अशी भावना सरपंच रवींद्र नागरे यांनी व्यक्त केली. या दुर्दैवी घटनेने लग्नाच्या मांडवाचे रूपांतर स्मशानशांततेत झाले. त्यामुळे संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us