
अशोक काळकुटे, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली होती, या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली, या प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहे, वाल्मिक कराडवर महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत, विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप केले आहेत.
वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनेच महादेव मुंडेंची हत्या केली, एवढंच नाही तर या हत्याकांडातील आय व्हिटनेसला देखील संपवण्यात आलं असा गंभीर आरोप वाल्मिक कराडवर विजयसिंह बांगर यांनी केला आहे. या आरोपांनंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान आता वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे करणाऱ्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीची आणि वाल्मिक कराडची एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि विजयसिंह बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांचा संवाद असल्याचा दावा केला जात आहे, मात्र टीव्ही 9 मराठी या कॉल रेकॉर्डिंगच्या सतत्येबाबत कोणतीही पुष्ठी करत नाही.
घरगुती वादाची ही कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या बीड जिल्ह्यात व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत. मारहाण करून चारित्र्यावर संशय घेतला असाही आरोप या कॉल रेकॉर्डिंगमध्ये विजयसिंह बांगर यांच्या पत्नीने केला आहे.
बांगर यांची प्रतिक्रिया
दरम्यान व्हायरल होत असलेल्या रेकॉर्डिंगवर विजयसिंह बांगर यांची देखील प्रतिक्रिया आता समोर आली आहे. माझ्या घरगुती वादाच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आपण भूमिका घेतल्याने हा बदनामीचा डाव असल्याचं विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी म्हटलं आहे. मात्र व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.