माकड पकडा अन् मिळवा 600 रुपये, वनविभागाची नवी योजना चर्चेत

राज्यामध्ये दिवसेंदिवस माकडांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे, माकडामुळे शेतीचं मोठं नुकासन होत आहे, माकडांकडून फळ बागेची नासधूस करण्यात येते, याला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

माकड पकडा अन् मिळवा 600 रुपये, वनविभागाची नवी योजना चर्चेत
माकडं पकडण्यासाठी योजना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 8:39 PM

राज्यामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे, ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे भटक्या कुंत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे, अनेकदा कुत्र्यांनी मणासांवर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत, त्यामुळे अशा कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपक्रम स्थानिक पातळीवर राबवले जात आहेत, दरम्यान आता याच पातळीवर माकडांना प्रतिबंध घालण्यासाठी वन विभागाकडून नवीन योजना राबवण्यात येणार आहे. वनविभागाच्या या नव्या योजनेची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. माकडं पकडणाऱ्या व्यक्तीला एका माकडा मागे 600 रुपये मिळणार आहेत. पकडलेल्या माकडांना वनविभागानं संरक्षित केलेल्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे.

सध्या राज्यभरात माकडांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. राज्यात माकडांनी संख्या वाढली असून, माकडांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे. फळ बागाच्या बागा माकडं उद्ध्वस्त करत आहेत, प्रचंड प्रमाणात नासधूस होत आहे, या संदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आता शेवटी वनविभागानं मोठा निर्णय घेतला आहे.  आता माकडं पकडण्याासाठी प्रशिक्षित माणसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना एका माकडामागे 600 रुपये देण्यात येणार आहेत.

काय आहे नेमकी योजना?

राज्यभरात माकडांनी धुमाकूळ घातला आहे, माकडांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत आहे, आता हे नुकसान थांबवण्यासाठी वनविभागाकडून खास योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षित माणसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या माणसांना प्रत्येक माकडामागे 600 रुपये दिले जाणार आहेत. दहा पेक्षा कमी माकडं पकडल्यास वनविभागा मार्फत संबंधित व्यक्तीला प्रत्येक माकडा मागे 600 रुपये दिले जाणार आहेत, तर 10 पेक्षा अधिक माकडं पकडल्यास  प्रत्येक माकडामागे 300 रुपये मिळणार आहेत, तसेच दहा पेक्षा अधिक माकडं पकडल्यास बोनस म्हणून एक हजार रुपये देखील मिळणार आहेत.

दरम्यान माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून, या माकडांना कोणतीही दुखापत न होता, जाळे आणि पिंजऱ्याच्या मदतीनं पकडायचं आहे, त्यानंतर पकडलेल्या माकडाला वनविभागाच्या ताब्यात द्यायचं आहे, त्यानंतर ही माकडं वनविभागानं आरक्षित केलेल्या जंगालामध्ये सोडण्यात येणार आहेत.