केंद्र सरकारच्या पथकाने यावं पण फक्त फोटो सेशन आणि ड्रामेबाजी करून जाऊ नये, शेतकऱ्यांची मोठी मागणी..
राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. परिस्थिती गंभीर आहे. मोठा दुष्काळ असून पिके हातून गेली आहेत. त्यातच केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. यादरम्यानच शेतकऱ्यांनी मोठी इच्छा व्यक्त केली.

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचा पथक आज जालना जिल्ह्यातल्या नानेगाव किनगाव वाडी आणि जामखेडमध्ये सोयाबीन कपाशी त्याचबरोबर फळबागाची पाहणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. मात्र हे पथक येण्यापूर्वी नानेगाव येथील शेतकरी भावनिक झाल्याचे पाहायला मिळालं, केंद्र सरकारच्या पथकाने यावं परंतु फक्त फोटोसेशन आणि ड्रामेबाजी करू नये तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली, आमच्या परिसरा, आणि सर्व जलस्रोत आटले असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय असेही शेतकऱ्यांनी सांगितलय. त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं असल्याचं शेतकरी बांधवांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितले. या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही येणारा दिवाळी सण कसा साजरा करायचा? असा संतप्त सवाल उपस्थित करत शेतकरी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं, नानेगाव येथील शेतातून शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केंद्रीय दुष्काळ पथकासमोर सविस्तरपणे मांडले. विभागात सरासरीच्या तुलनेत पावसाची 34.65 टक्के तूट असून, धरणांमधील पाणीसाठा केवळ 30.7 टक्क्यांवर आला आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, काही जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीही खालावली आहे. सध्या 190 गावं आणि 157 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने टँकर आणि विहिरींचे नियोजन केले आहे. दरम्यान, केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी सादर केलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय पथक आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.
दुष्काळाची आकडेवारी – पावसाची 34.65% तूट – धरणांमध्ये केवळ 30.7% पाणीसाठा – खरीप पेरणी 52 लाख हेक्टर क्षेत्रावर
पावसाचा खंड – 37 महसूल मंडळांत 30 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड – 155 महसूल मंडळांत 21 ते 30 दिवस पावसाचा खंड – विभागातील 496 महसूल मंडळांचा आढावा – जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण घटले
खरीप पिकांवर संकट – खरीप पेरणी जवळपास 100% पूर्ण – एकूण खरीप क्षेत्रापैकी 56% क्षेत्रावर सोयाबीन – कापसाची वाढ खुंटली; पाते आणि फुलांची गळ – सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण घटले – जालना जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांत उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट
