
महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपची शिवसेना शिंदे गटासोबत युती होती, 29 महापालिकांपैकी जवळपास 25 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये जनतेनं भाजप आणि महायुतीच्या बाजुने कल दिला आहे. याचा मोठा फटका हा दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून आलं, काँग्रेसने मात्र राज्यात अनेक ठिकाणी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे महापौर पदाच्या निवडणुकीकडे. राज्यात अशा काही महापालिका आहेत, जिथे पक्षीय बलाबल पहाता घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला 89 जागा मिळाल्या मात्र तरी देखील त्यांना महापौरपदासाठी स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांना शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. ही सर्व शक्यता लक्षात घेता तसेच घोडेबाजार टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आधीच आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं भाजपाकडे मुंबईत अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हा दावा फेटळून लावला आहे.
मुंबईमध्ये या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता चंद्रपुरातून देखील मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रपुरात महापौर पदासाठी काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडी समोर आल्याचं पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवारांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाला आहेत. तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकरांकडून देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, येत्या दोन दिवसांत महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता चंद्रपुरात महापौर कोण होणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.