चाळीसगावच्या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाल्यानंतर मदत, नदीपात्रावरील अतिक्रमणही हटवणार- जयंत पाटील

| Updated on: Sep 04, 2021 | 2:26 PM

चाळीसगाव परिसरात नदी पात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेल्या अतिरीक्त बांधकामामुळे ही पूरपरिस्थिती आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला प्रचंड विरोध स्थानिकांनी केला असल्याचंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

चाळीसगावच्या नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाल्यानंतर मदत, नदीपात्रावरील अतिक्रमणही हटवणार- जयंत पाटील
जयंत पाटील यांच्याकडून चाळीसगावमधील पूरग्रस्त भागाची पाहणी
Follow us on

जळगाव : नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यसरकारने याआधीच धोरण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयात लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाईल, असं आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Jayant Patil inspects the flood damaged Chalisgaon area)

पुरामुळे शेती खरवडून निघाली आहे, अनेक जनावरे वाहून गेली आहेत, अशी माहिती पाटील यांनी माध्यमांना दिली. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आव्हान समोर आहे. त्याची तयारी स्थानिकांनी केली आहे. चाळीसगाव परिसरात नदी पात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेल्या अतिरीक्त बांधकामामुळे ही पूरपरिस्थिती आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला प्रचंड विरोध स्थानिकांनी केला असल्याचंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पर्यावरणाच्या विरोधात विनापरवाना नदीपात्रात असलेले बांधकाम हटविण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

‘नदीपात्रालगत संरक्षक भिंत बांधणार’

नदी पात्रालगत सरंक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरीकांकडून समोर येत आहे. त्यामुळे गाव-वस्तीचे पुरापासून बचाव करण्यासाठी लवकरच सरंक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही करु असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले. चाळीसगाव भागात अतिवृष्टीनंतर काही अफवा उठत आहेत. त्यावर आवाहन करताना जयंत पाटील यांनी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत शासकीय यंत्रणा अधिकृत माहिती जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंच्या पाठीशी’

ईडीच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे हे सर्व जगजाहीर आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या देशात विरुद्ध बाजूने सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. जाचक त्रास देण्याचा प्रयत्न ED, CBI या केंद्राच्या एजन्सी करत आहेत हे जगजाहीर आहे. कोणाची चूक नुसताना बदनाम केलं जात आहे. हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा डाव आहे, असं सांगतानाच खडसे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभा आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही; राऊतांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या भेट; चाकणकरांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन

Jayant Patil inspects the flood damaged Chalisgaon area