
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होता. त्याची जय्यत तयारी झाली होती. मात्र त्याआधीच एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याची. लग्नाची तयारी सुरु असताना अचानक ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थीर असल्याचं म्हटलं जात आहे. पण तोपर्यंत लग्नसोहळा पुढे ढकलला आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामुळे सांगली जिल्हा जास्तच चर्चेत
सांगली हा महाराष्ट्रातील एक छोटा जिल्हा आहे. अलिकडेच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नामुळे सांगली जिल्हा जास्तच चर्चेत आला आहे. सांगली हे एक खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तरीही लोकांना त्याबद्दलच्या अनेक अशा मनोरंजक गोष्टी बऱ्याचजणांना माहित नाहीत. सांगली हे कृष्णा नदीजवळ वसलेले महाराष्ट्रातील एक छोटे शहर आहे. पण ते जगभर भारताचे हळदीचे शहर आणि भारताचे पिवळे शहर म्हणून ओळखले जाते. कारण हे शहर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियामध्ये सर्वाधिक प्रमाणात मसाले तयार करते. आणि नक्कीच याबद्दल अनेकांना माहित नसेल.
सांगलीतील हे मंदिर प्रमुख आकर्षण
सांगलीतील गणेश मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे. अनेक दशकांपासून हे मंदिर एक प्रमुख आकर्षण आहे. सांगलीचे पहिले शासक चिंतामण राव पटवर्धन यांनी 1843 मध्ये बांधलेले हे गणेश मंदिर असून या मंदिरात बाप्पाची तांब्याची मूर्ती आहे. जी मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातून दिसते. हे मंदिर पेशवे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना देखील मानले जाते.
मंदिराचे वैशिष्ट्य काय आहे?
मुख्य म्हणजे हे गणेश मंदिर ज्योतिबा टेकड्यांमधील दगडांचा वापर करून बांधले गेल्याचं म्हटलं जातं. जे भगवान शिवाचे अवतार ज्योतिबा यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गणेश मंदिराचे प्रवेशद्वार देखील त्याला एक वेगळी ओळख देते. प्रवेशद्वार वेगवेगळ्या रंगांच्या नैसर्गिक लाकडावर कलाकृतींनी कोरलेले आहे.
खाद्यसंस्कृतीसाठी सांगली तेवढीच प्रसिद्ध
सांगली ही खाद्यसंस्कृतीसाठी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. जसं की, सांगली जिल्ह्यामध्ये भडंग प्रसिद्ध आहे. तसेच तेथील मनुका प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त सांगलीत सर्वात जास्त प्रसिद्ध असेल तर ते द्राक्षे. सांगली जिल्ह्यात द्राक्षे आणि ज्वारी यांसारखी पीके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.