महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद, 20 मे रोजी घेणार शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद मिळालं आहे. मंगळवारी 20 मे रोजी राजभवनात मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. नव्या सरकारमध्ये मंत्रि‍पदापासून त्यांना डावलण्यात आलं होतं.

महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद, 20 मे रोजी घेणार शपथ
Image Credit source: TV9
| Updated on: May 20, 2025 | 2:48 PM

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ मंगळवारी 20 मे रोजी मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा शेरोशायरी करून टोमणेही मारले होते. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांना काही मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 50 जण उपस्थित राहणार आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.

धनंजय मुंडे यांना बीडमधील सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मुंडेकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं. मात्र मुंडेच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावरुन वाद होऊ नये म्हणून पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते खातं स्वत:कडे ठेवलं होतं. मात्र आता पु्न्हा एकदा भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांकडे मविआ सरकारमध्येही याच खात्याची जबाबदारी होती.

छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्याने 1 लाख 34 हजार 154 मतं पडली होती. त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता. माणिकराव शिंदे यांना 1 लाख 8 हजार 2 मतं पडली होती.