निकालाआधी दहावीच्या विद्यार्थ्याचे टोकाचं पाऊल, रिझल्ट पाहिला असता तर..

दहावीच्या निकालाच्या भीतीपोटी छत्रपती संभाजीनगरमधील सोहम मोरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे निकालात तो ४२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

निकालाआधी दहावीच्या विद्यार्थ्याचे टोकाचं पाऊल, रिझल्ट पाहिला असता तर..
SSC Result
| Updated on: May 09, 2026 | 7:44 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्र राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता असताना दुसरीकडे दहावीच्या एका विद्यार्थ्याने निकालाची धास्ती घेत निकाल लागण्यापूर्वीच आपले आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिकनगर परिसरात ही घटना घडली. सोहम मोरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे तो दहावी उत्तीर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोरे हा दहावीचा विद्यार्थी निकालाच्या दिवसापासून प्रचंड दडपणाखाली होता. आपण परीक्षेत नापास होऊ, या भीतीने त्याला ग्रासले होते. याच मानसिक तणावातून त्याने निकाल लागण्यापूर्वीच पुंडलिकनगर येथील राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. तसेच हळहळही व्यक्त करण्यात येत आहे.

सोहमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो कमालीचा शांत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट्स देखील डिलीट केले होते. आपल्या मागे कोणताही पुरावा किंवा संपर्क राहू नये, अशा मानसिकतेतून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

यात सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे ज्या निकालाच्या भीतीपोटी सोहमने जीव दिला, त्या निकालात तो यशस्वी झाला आहे. सोहमला ४२ टक्के गुण मिळाले असून तो उत्तीर्ण झाला आहे. तो पास झाल्याची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ” सोहमने थोडा धीर धरला असता तर आज तो आमच्यात असता,” अशी भावना त्याच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.

निकालाची वैशिष्ट्ये

बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के इतकी आहे. तर मुलांची ८९.५६ टक्के इतकी आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी जास्त आहे. तर राज्यातील ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्रातील ४,२२,८९१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील तब्बल ९,९१२ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ९१.२२ टक्के लागला आहे.

Follow Us