
मागील काही दिवसांपासून अमेरिका भारतावर अनेक निर्बंध लादताना दिसली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. ज्यानंतर भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास थांबवली आहे. मात्र, यानंतर अमेरिका भारतावरील टॅरिफ कधी कमी करणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. या टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होऊ शकत नव्हते. अखेर अमेरिकेने थेट भारतावरील टॅरिफ कमी केला. भारत आणि अमेरिकेत नक्की काय मैत्री आहे हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. भारत आणि अमेरिकेचे संबंध टॅरिफमुळे तणावात असताना पाकिस्तानने थेट याचा फायदा घेत अमेरिकेसोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. शिवाय भारतावर अमेरिकेने लावलेल्या मोठ्या टॅरिफच्या विरोधात चीन देखील मैदानात आला होता. चीनने या टॅरिफला विरोध केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली असून 50 टक्के टॅरिफ थेट 18 टक्क्यांवर आणला. हा अत्यंत मोठा दिलासा भारतीय व्यापाऱ्यांना मिळाला. 50 टक्के टॅरिफ भारतीय वस्तूंवर लावल्याने भारतातून अमेरिकेत वस्तू पाठवणे कठीण झाले होते. यादरम्यान भारताने अनेक देशांसोबत महत्वाचे व्यापार करार केले. शेवटी भारतावरील टॅरिफ कमी करण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला.
अमेरिकेने भारतावर टॅरिफ कमी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. मैत्रीचा नवीन अध्याय म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे.
मैत्रीचा एक नवीन अध्याय!
भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे.
जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या… https://t.co/cOSEDXoVWp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2026
जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल.
महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवीन क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.